मराठी भाषा शिकण्याची गरजच काय, असा प्रश्न समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबु आझमी यांनी उपस्थित केला. ते नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येतात म्हणा चर्चेत येण्यासाठी खटाटोप करतात.
तुम्हाला आठवत असेल की विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान त्यांनी औरंगजेबाचं कौतुक करून निलंबनाची कारवाई करून घेतली होती. तेव्हा त्यांनी सारवासारव करून वेळ पुढे ढकलली. पण, आता, ज्या राज्याची राजभाषा मराठी आहे, त्या मराठीची गरजच काय असा प्रश्न त्यांनी केलाय.त्यांच्यामुळे मराठीचा स्वाभिमान असलेल्या नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसू लागलीय. नेमकं काय झालं? हे जाणून घेऊ.
भिवंडी मतदारसंघात २ ऑक्टोबरला आयोजित कार्यक्रमात अबु आझमी यांनी माध्यमांशी हिंदीत संवाद साधला. पण, जेव्हा माध्यम प्रतिनिधींनी मराठीत बाईट देण्याची म्हणजे बोलण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रविरोधी राग आळवायला सुरुवात केली. मराठीची गरजच काय गरज म्हणत दिल्ली, उत्तर प्रदेशमधील लोकांना मराठी समजत नसल्याचं सांगितलं. यावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
महाराष्ट्रात राजकारण करत आहात. तर उत्तर प्रदेशमधील बंधुंची राज्यात राजकारण करताना काळजी कशामुळे करत आहात? भिवंडी महाराष्ट्रात आहे. येथे फक्त मराठीच चालणार. जर तुम्हाला मराठीची लाज वाटत असेल तर, मनसे स्टाईल इशारा देण्यात येईल, असा मनसेनं इशारा दिलाय.
अबु आझमी यांच्याविरोधात संताप निर्माण होत असताना नेहमीप्रमाणं त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी कसरत केलीय. आपण मराठी शिकत आहोत, आय लव्ह मराठी, असे म्हणत त्यांनी ऑफीसमधील मराठी येत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मराठी बोलण्याचा सल्ला दिलाय.
मराठीबद्दल अबु आझमी यांनी घेतलेली पहिली आणि नंतरची भूमिका वेगळी आहे. मराठी भाषा न शिकताही अबु आझमी यांच्यासारखे राजकीय नेते, सेलिब्रिटी महाराष्ट्रात सुखानं राहू शकतात. त्यांनी मराठी न शिकल्यानं त्यांचं वैयक्तिक नुकसान होत नाही. पण, मराठी न शिकलेल्या लोकांनी त्यांचा संकुचितपणा दाखविल्यावरच आपल्याला कळते की आपल्या मराठी भाषेची खूपच अवहेलना होतेय. मराठी माणसं भाषेबाबत लवचिक राहून एकमेकांना सहकार्याची भावना ठेवतात. पण, मराठी भाषा येत नसताना वर्षानुवर्षे आपल्या मातृभाषेचा अवमान करण्याचा कोणाला अधिकार आहे का? म्हतारी मेल्याचं दु:ख नाही. पण, काळ सोकावतोय.